‘‘अन्नधान्याची चलनवाढ हाताळणे कठीण असले तरी यंदाचा रब्बी हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. सरकारने
कृषीमालाच्या किमान आधारभूत किमती वाढविल्यास उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी उद्युक्त होतील. शेती उत्पादन वाढल्यास अन्नधान्यांच्या किमतीही स्थिर होतील,’’ अशी शक्यता केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार डॉ. रघुराम राजन यांनी वर्तविली.
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग’ च्या (एनआयबीएम) नवव्या पदवीप्रदान समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर व एनआयबीएमच्या नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष  डॉ. डी. सुब्बाराव, संचालक अॅलन सी. ए. परेरा या वेळी उपस्थित होते.
चालू खात्यातील तूट ही काळजीची गोष्ट असल्याचे सांगून रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी तातडीच्या व सकल अर्थशास्त्रीय उपायांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘वित्तीय तूट कमी करण्यासाठी करवाढ अथवा खर्चकपात हे दोन मार्ग आहेत. करवाढीमुळे विकासाची गती मंदावत असल्याने ती आपल्याला नको आहे. त्यामुळे खर्चकपात हा उपयुक्त पर्याय ठरेल. ही कपात नियोजित खर्चामधूनच करणे इष्ट आहे. यात डिझेल, वीजपुरवठा आणि खतांच्या किमतीवरील चुकीच्या आर्थिक सवलती कमी करण्याची गरज आहे. ही कपात न्यायिक पद्धतीने करण्यात आली, तर विकासाच्या लांब पल्ल्याच्या दृष्टीने ती योग्य ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत विश्लेषकांच्या काही तक्रारी आहेत. मात्र करवाढ नको असताना घसघशीत आर्थिक सवलतींची अपेक्षा धरून चालणार नाही. औद्योगिक उत्पादनांची चलनवाढ आटोक्यात आणण्यात आपल्याला यश आले आहे परंतु अन्नधान्याची चलनवाढ नियंत्रणात आणणे शक्य झालेले नाही. मात्र यंदाचा रब्बी हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. सरकारने कृषीमालाच्या आधारभूत किमती वाढविल्या तर शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी उद्युक्त होतील. शेती उत्पादन वाढल्यास अन्नधान्याच्या किमतीही स्थिर होण्याची अपेक्षा आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या किमतीही उत्पादनवाढीमुळे स्थिर झाल्या आहेत. लहान आणि मध्यम उद्योगांची वाढ व्हावी यासाठी त्यांना सवलती देण्यात आल्या आहेत. या उद्योगांनी मोठय़ा प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करणे अपेक्षित आहे. करांची मूलभूत रचना आपल्याला बदलायची नाही. कर भरण्यास पात्र असूनही जे नागरिक तो भरत नाहीत त्यांना करांच्या जाळ्यात आणणे हाच यामागील उद्देश आहे.’’
सुब्बाराव यांनी सांगितले की, ‘‘पुढील दहा वर्षे बँकिंग व्यवसायासाठी आकर्षक आणि आव्हानात्मक ठरणार आहेत. देशातील बँकिंगच्या सोईंपासून वंचित असणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना या सोई मिळवून देणे आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या बँकांवर असणार आहेत. बँकेत पैसा ठेवणे व कर्ज घेणे या दोन्ही गोष्टी आकर्षक व्हाव्यात यासाठी बँकेच्या ग्राहकांना व्याज जास्त मिळावे व त्याच वेळी कर्जदारांसाठी व्याजदर कमी ठेवता यावा हे आव्हान बँकांसमोर आहे.’’
या वेळी विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच बँकांतर्फे देण्यात आलेली सुवर्णपदके रघुराम राजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.