पुणे : नव्या वर्षात नोकरदार, विद्यार्थ्यांना जोडसुट्ट्यांची मेजवानी मिळणार आहे. वर्षभरात किमान सहा सार्वजनिक सुट्या शनिवार-रविवारला जोडून येत असून, वर्षभरातील सहली, कौटुंबिक कार्यक्रम आणि अन्य कामांचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच करणे शक्य होणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये शुक्रवारी असलेला प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) शनिवार-रविवारला जोडून आहे. फेब्रुवारीमध्ये पुन्हा शनिवार-रविवारला जोडून सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंती आहे. मार्चमध्ये तीन सुट्या शनिवार-रविवारला जोडून येत आहेत. त्यात महाशिवरात्र (८ मार्च), धुलिवंदन (२५ मार्च), गुडफ्रायडे (२९ मार्च) या सुट्यांचा समावेश आहे. त्यानंतर जूनमध्ये बकरी ईदची (१७ जून), सप्टेंबरमध्ये ईद-ए-मिलादची (१६ सप्टेंबर) जोड सुटी मिळणार आहे.
हेही वाचा : हळद रुसली?… यंदा हळदीचे लागवड क्षेत्र का झाले कमी?
पुढील वर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या सुटीनंतर ३ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे दसऱ्याची सुटी शनिवारच्या सुटीत जाणार आहे. तर २८ ऑक्टोबरला असणाऱ्या वसुबारसपासून दिवाळी सुरू होणार आहे. ३१ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबरला दीपावली पाडवा, ३ नोव्हेंबरला भाऊबीज आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरला असलेल्या गुरू नानक जयंतीची सुटी शनिवार-रविवारला जोडून येत आहे.