Raj Thackeray in Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला संबोधित केलं. मराठी साहित्य परिषदेच्या बोधचिन्हाचे राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी त्यांनी आजच्या साहित्यिक आणि कवींवर नाराजी व्यक्त करत राजकारण्यांवरही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, आपलं मराठी साहित्य वाढवण्याकरता आम्ही आहोत. हे मी माझ्या वतीने नक्कीच सांगू शकतो. पण या साहित्य संमेलनात ऐकायला बोलवावं, बोलायला बोलवू नये”, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले, “पण महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी मी पाहत आलोय. मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात, मनात रुजलेला असायचा आणि योग्यवेळी ठणकावून सांगणे, राजकारण्यांना, बिघडलेल्या सांस्कृतिक बाबींना सांगण्याची हिंमत, धमक होती, ती आज कमी दिसतेय, असं निश्चित वाटतंय”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

तुम्हीच अधिकारवाणीने बोलू शकता

“आजच्या महाराष्ट्राचा झालेला खेळ, महाराष्ट्राची सर्कस झालीय. कोणी विदुषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारतंय. खरंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे लोक आहेत, ज्यांनी जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत. पण ज्या प्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय, कशाला काही धरबंद नाही, अशा गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. तिथं त्यांचे कान धरून शिकवणं, समजावणं हे तुमचं सर्वांत मोठं कर्तव्य आहे, असं मी मानतो. त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकतो. ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिलीत, मुलाखती दिल्यात, त्यावर सोशल मीडियावर काय चर्चा आहे हे मी पाहतच नाही. माझं बोलून झालंय ना. मग विषय संपला”, असं राज ठाकरे म्हणाले.

देशाला दिशा देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र

“देशाला दिशा देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. पण आता भाषा खालच्या थराला गेली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ म्हणावे असे नेतेही अशा लोकांच्या आहारी गेले आहेत. ही जबाबदारी साहित्यिकांनी घेणं गरजेचं आहे. पण यासाठी आपण अशा प्रकारची साहित्यिक चळवळ उभं करणं गरजेचं वाटतं. भविष्यातील लहान मुलांना वाटेल की हेच राजकारण आहे. अशी भाषा म्हणजेच राजकारण. या राजकारण्यांना खडेबोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are people in maharashtra who should be made to jump from buildings without nets raj thackerays quip sgk