पुणे: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) मार्गदर्शक सूचनेनुसार दहा वर्षांपूर्वीचे आधारकार्ड अद्ययावतीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून या मोहिमेंतर्गत अनेकदा उपक्रम राबविण्यात आले, मुदतवाढ देण्यात आली. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून आतापर्यंत केवळ ७८ हजार ७८९ जणांनी आधार अद्ययावत केले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील एकूण ३० लाख नागरिकांचे आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्यापही २९ लाख २१ हजार २११ जणांचे आधार अद्ययावत करणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील क्षेत्रीय कार्यालय, राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँक, महिला बालविकास कार्यालय, डाक कार्यालय आणि इतर शासकीय संस्था, कार्यालय इमारतींच्या आवारातील तब्बल ६८९ केंद्रांवर मार्च महिन्यापासून आधार अद्ययावतीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात मिळून एक कोटी ३२ लाख ६ हजार १०४ नागरिकांनी आधारकार्ड काढले आहे. त्यापैकी ३० लाख नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार काढले आहे.
हेही वाचा… खुशखबर! कोथिंबीर झाली स्वस्त
दहा वर्षांत आधारमध्ये काही बदल केला नसल्यास आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात आधार अद्ययावतीकरण मोहीम सुरू केली. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात पंधरवडा आयोजित केला होता. विशेष मोहीम राबवून त्याला मुदतवाढ देण्यात आली. जून महिन्यापर्यंत ६० हजार नागरिकांनी आधार अद्ययावत करून घेतले, तर पुढील चार महिन्यांत अवघ्या १८ हजार नागरिकांनी आधार अद्ययावत केले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरासह जिल्ह्यात आधार अद्ययावतीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील ३० लाख जुन्या आधारकार्डधारकांपैकी केवळ ७८ हजार नागरिकांनी आधार अद्ययावत केले आहे. नागरिकांना अद्ययावतीकरण सहज करता यावे म्हणून आधार केंद्रांची संख्या वाढविली आहे. तसेच आधार केंद्र चालकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले असून बँक, जिल्हा बँक, टपाल कार्यालय आणि इतर शासकीय इमारतींच्या परिसरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या आधारधारकांनी तातडीने आधार अद्ययावतीकरण करून घ्यावे. – रोहिणी आखाडे, आधार समन्वयक अधिकारी