पुणे : देशभरात तयार घरांना ग्राहकांची पसंती कायम दिसून येते. अलीकडच्या काळात बांधकाम सुरू असलेल्या घरांकडेही ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. प्रमुख सात महानगरांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये घरे घेणाऱ्यांची संख्या यंदा पहिल्या तिमाहीत ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. पुण्यात ही संख्या ४५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
अनारॉक रिसर्चने दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, कोलकता, चेन्नई या प्रमुख सात महानगरांमधील पहिल्या तिमाहीतील घरांच्या विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत सात महानगरांमध्ये १ लाख १४ हजार घरांची विक्री झाली. त्यातील ४१ टक्के घरे ही नव्याने सुरू झालेल्या गृहप्रकल्पांमधील होती. अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिक कंपन्या नवीन गृहप्रकल्प सादर करीत आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्यावर विश्वास टाकून नवीन गृहप्रकल्पांमध्ये घरे घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा >>>ऐन दिवाळीत रेल्वे प्रवासी वाऱ्यावर? पुणे स्थानक रोज दोन ते चार तास बंद राहण्याची शक्यता
हेही वाचा >>>वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
मागील काही वर्षांचा विचार करता नव्याने सुरू झालेल्या गृहप्रकल्पांमध्ये घरे खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होती. ही संख्या २०१९ मध्ये २६ टक्के होती आणि त्या वेळी वर्षभरात बांधकाम सुरू असलेल्या ८७ हजार ५२० घरांची विक्री झाली होती. सात महानगरांमध्ये मागील वर्षी पहिल्या तिमाहीत ९९ हजार ५५० घरांची विक्री झाली. त्यातील ३६ टक्के घरे नव्याने सुरू झालेल्या गृहप्रकल्पांतील होती, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा >>>पुणे: शेगावसाठी अकोला विमानतळ सुरू करा! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हैदराबादमध्ये सर्वाधिक मागणी
पहिल्या तिमाहीत सात महानगरांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरांना हैदराबादमध्ये सर्वाधिक ४६ टक्के मागणी दिसून आली. दिल्लीत ही मागणी सर्वांत कमी म्हणजे ३० टक्केच दिसून आली.
खूप काळापासून तयार घरांना ग्राहकांची पसंती कायम आहे. परंतु, आता नव्याने सुरू झालेल्या गृहप्रकल्पांकडे ग्राहक वळू लागले आहेत. आधी नवीन गृहप्रकल्पांना विलंब होण्याचे प्रमाण जास्त होते. आता ते कमी झाल्याचे कारण यामागे आहे.- अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप