पुणे : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्याने वरचष्मा वाढलेल्या शिवसेनेने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात शहरातील हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ घ्यावेत, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. मात्र, वडगावशेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, तर खडकवासला मतदारसंघात भाजपचा आमदार असल्याने महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या या मागणीनंतर शहर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासह शहरातील अन्य पाच जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे येथे भाजपचेच उमेदवार असतील. महायुतीमध्ये कोणी जागांची मागणी केली असली तरी, कोणत्या जागा सोडायच्या, याचा निर्णय भाजपच्या सुकाणू समितीकडून घेतला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढविणार आहेत. त्यादृष्टीने महायुतीतील पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. शहर आणि जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत अद्यापही महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेकडून तीन मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला आहे.
हेही वाचा – ‘राहुल गांधी आता हुशार झाले आहेत,’ रामदास आठवले यांची टिप्पणी
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना फुटली नव्हती आणि निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होती. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला शहरातील एकही मतदारसंघ मिळाला नव्हता. त्यामुळे आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदरासंघ मिळविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कमी जागा लढवित जास्त जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेचा वरचष्मा राहिला होता. ही बाबही शहर पदाधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. त्यानुसार या तीन मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला आहे.
पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला असून, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
हेही वाचा – भारतात ‘हम दो हमारे एक’ कायदा हवा
विधानसभा निवडणूक महायुती एकत्रित लढविणार आहे. त्यादृष्टीने हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या तीन जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. महायुतीमध्ये या जागा निश्चित शिवसेनेला मिळतील. – नाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना
खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरूडमध्ये भाजपचे आमदार आहेत. पोटनिवडणुकीत कसब्याची जागा गमाविली असली तरी, त्यावरच भाजपचा हक्क आहे. त्यामुळे सहा जागा भाजपला हव्यात. मात्र जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतली. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप