पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या (एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना नोटीसा बजाविण्यास सुरुवात झाली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर भूसंपादनासाठी स्वत:हून जमीन देणाऱ्यांना अधिकचा २५ टक्के मोबदला देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहेत. प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामध्ये मावळ आणि मुळशी तालुक्याने आघाडी घेतली आहे. या दोन्ही तालुक्यांतील २६ गावांत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. हे मूल्यांकन निश्चित करताना जागा मालकांना विचारात घेऊन ते पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून भूसंपादन करण्यात येणाऱ्या प्रत्येक जमीननिहाय स्वतंत्र मूल्याकंन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील भूसंपादन सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली होती.
हेही वाचा >>>अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून, गुणवत्ता यादी १२ जुलैला
दरम्यान, भूसंपादन नोटीस प्राप्त झाल्यानंतर स्वत:हून जमीन देणाऱ्यांना मोबदल्याची २५ टक्के रक्कम अधिक देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बांधितांनी मुदतीत संमतिपत्र द्यावीत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर पश्चिम भागातील रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रकिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे या नोटीसा देण्यात आल्या अहेत.-संजय आसवले,उपविभागीय अधिकारी, हवेली