भाजपाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांनी कुटुंबातील वादावरील मौन सोडले आहे. “आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. ही केवळ वावटळ उठवली गेली होती. शंकर जगताप हे माझ्या मुलासारखे आहेत. उमेदवारी कोणालाही दिली तरी त्याला जगताप कुटुंबाचा पाठींबा होताच”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी दिली आहे. गेली तीस वर्षे पडद्याच्या पाठीमागे काम करत असले तरी निवडणूक कशी लढायची हे मला माहित आहे, असेदेखील अश्विनी जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीवरून जगताप कुटुंबात वाद असल्याचे बोलले जात होते. मात्र, या वादावर अखेर पडदा पडला आहे. भाजपाकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळेल. उमेदवारी कोणालाही दिली तरी जगताप कुटुंबाचा पाठींबा असेल. आम्ही सर्व एक आहोत, असे आम्ही सांगितले होते.
अश्विनी पुढे म्हणाल्या की, जगताप कुटुंबात वाद नाही. काही जणांनी वावटळ उठवली होती. शंकर जगताप हे माझ्या मुलासारखे आहेत. गेली तीस वर्षे झाले एकत्र कुटुंब आहे. कुठलाही वाद घरात नाही. आम्ही नेहमी म्हणायचो की, आम्हाला सहा मुले आहेत. कृपा करून हाथ जोडून विनंती आहे असे वावटळ उठवू नका. आमचे कुटुंब एक आहे, एक राहणार. असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, पडद्याच्या पाठीमागून जरी काम करत असले तरी गेली तीस वर्षे त्यांच्या पाठीशी उभी होते. बराच परिसर मी पिंजून काढलेला आहे. निवडणूक कशी लढवायची हे मला माहित आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.