पुणे : चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यात गुन्हेगारी टोळीचा हात नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. हल्ला प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश कदम यांनी शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तालयास भेट दिली. कदम यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील वांद्रे भागात सैफ अली खान याच्या निवासस्थानात शिरुन हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. यापूर्वी वांद्रे भागात अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबार करण्यात आला. माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमागे लाॅरेन्स बिष्णोई टाेळीचा हात आहे. खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे गुन्हेगारी टोळीचा हात आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
कदम म्हणाले, ‘सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे गुन्हेगारी टोळीचा हात नाही. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील छबीत एक संशयित आढळून आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे.’
हेही वाचा – शालेय मंत्र्यांची पिंपरी- चिंचवड मधील शाळेला अचानक भेट; शिक्षकांची उडाली धांदल!
खान याच्या अपार्टमेंटच्या परिसरात सुरक्षारक्षक नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू असून, संशयितांच्या मागावर पोलीस आहेत, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – कौटुंबिक वादातून पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप
अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाईचे आदेश
पुणे शहरात मेफेड्रोनसह वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत दिले. शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालक, तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश कदम यांनी दिले. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढवावी, तसेच गुटखा, अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश त्यांंनी दिले. पुणे शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित (एआय) कॅमेरे बसल्यास गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या.