वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. शरीरात अन्न घालणं सोपं आहे मात्र ते बाहेर काढणं अवघड आहे असं मत संशोधक आणि आरोग्य विशेष तज्ज्ञ डॉ. जगन्ना दीक्षित यांनी व्यक्त केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आपले आरोग्य आपल्या हाती या उपक्रमात विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दीक्षित यांनी हे मत व्यक्त केले.
लठ्ठपणा, आजार वाढणे हे अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरते. लठ्ठ होण्यामागे अनुवंशिक, वयोमान, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या सवयी अशी अनेक कारणे आहेत. मद्यपान, धूम्रपान, औषधांचा प्रभाव यामुळेही वजन वाढते. आवश्यकता नसताना खाणं, शारीरिक श्रम न केल्याने अतिरिक्त उर्जा निर्माण होते आणि चरबीच्या रुपाने ती साठत राहते. वजन कमी करण्यासाठी प्रसंगी उपासमार करणारीही डाएट केली जातात. मात्र वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात असे दीक्षित यांनी म्हटले आहे.
आपल्या शरीरात उर्जा साठवण्याचं, निर्माण करण्याचं काम इन्सुलिन करते. रक्तातील इन्सुलिन वाढले की उच्च रक्तदाब, लठ्ठपणा वाढतो. रक्तातील चरबी वाढते आणि वाढलेल्या इन्सुलिनमुले शरीरात लठ्ठपणा येतो, यामुळे मधुमेहाचीही लागण होऊ शकते. अशावेळी शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवायचे असेल तर शरीरातील इन्सुलिन कमी करणे हा चांगला उपाय आहे असेही दीक्षित यांनी स्पष्ट केलं.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, जिल्हा परिषद सदस्या अनित इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.