लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: यंदा जिल्ह्यात मोसमी पावसाला विलंबाने सुरुवात झाली. घाटमाथावगळता इतरत्र ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात जुलै महिन्याचे दहा दिवस संपूनही अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली होती. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिल्याने ४७ गावांत ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्व ठिकाणी एकही शासकीय टँकर नसून, खासगी टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे खासगी टँकरचालकांची चलती असल्याचे चित्र आहे.
पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यंदा कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७८ हजार २०९ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिना कोरडाच गेल्याने पाणीटंचाईच्या झळा ग्रामीणसह शहरवासीयांनादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा… कोणी उमेदवार देता का?…पुण्यात महाविकास आघाडी सक्षम उमेदवारांच्या शोधात
मात्र, जूनअखेरीस मोसमी पावसाचे आगमन होऊन सुरुवातीचे आठ ते दहा दिवस पावसांची रिपरिप कायम होती. परिणामी पाणीटंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या. त्यामुळे ६ जुलैपासून जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी १२ ने कमी होऊन ३२ टँकर सुरू होते. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा तीनची वाढ होत सध्या ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
हेही वाचा… पुणे: नर्तिकेच्या घरातून १३ लाखांचा ऐवज चोरणारा गजाआड
दरम्यान, जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील १७ गावांत १२ टँकर, जुन्नरमध्ये सात गावांत सहा टँकर, खेडमध्ये १७ गावांत ११ टँकर, पुरंदरमध्ये सहा गावांत सहा टँकर असे ४७ गावांत ३५ टँकर सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाचा अजब दावा
जिल्ह्यातील अनेक भाग दुर्गम आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय टँकर पोहोचू शकत नाहीत. शासकीय टँकर आकाराने मोठे असल्याने डोंगराळ, दुर्गम भागात पाण्याने भरलेले मोठे टँकर पोहोचवणे जिकिरीचे असते. त्याउलट खासगी टँकरवाल्यांकडे छोटे-छोटे पाण्याचे टँकर उपलब्ध असतात. तसेच दुर्गम ठिकाणी लोकसंख्या कमी असल्याने छोटे टँकरच पोहोचविण्यात येतात. त्यामुळे शासकीय टँकरपेक्षा खासगी टँकर जास्त असल्याचा अजब दावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला.
सरासरीपेक्षा कमी पाऊस
जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के कमी पाऊस पडला असून, ७५ मिमी पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८४ मिमी पावसाची नोंद होणे आवश्यक होते. मात्र, आजवर २०९ मिमी पाऊस पडला आहे. पोषक वातावरणामुळे उत्तरेत मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही पुणे जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.