पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ऑक्टोबरमध्ये खुनी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. त्यानंतर हल्लेखोरांची आरोपी वकिलांसोबत पिरंगुट परिसरात बैठक झाल्याचे तपासात निदर्शनास आले असून, या दोन्ही वकिलांना मोहोळच्या खुनामागचा सूत्रधार माहीत आहे, असा दावा तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उडान या दोन आरोपी वकिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, नव्याने अटक केलेल्या धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोन आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी वकिलांना आणि त्यांच्या नवीन दोन आरोपींना गुन्हे शाखेने गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.

हेही वाचा >>>अजित पवारांनी ठेवले कानावर हात: म्हणाले, मला काहीही माहिती…’

‘या खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींनी ऑक्टोबरमध्ये शरद मोहोळ याच्यावर खुनी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि नामदेव महिपती कानगुडे या आरोपींनी दोन्ही आरोपी वकिलांसोबत पिरंगुट परिसरात बैठक घेतली होती. हे आरोपी नेमके कुठे भेटले, त्यांच्यासोबत आणखी कोण होते, याचा शोध घ्यायचा आहे. मोहोळचा खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात असताना आरोपी वकील त्यांना भेटले. तिथेच आरोपींनी जुने सीमकार्ड टाकून देत नवीन सीमकार्डवरून एका व्यक्तीला फोन केला होता,’ असे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले.

सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपी वकिलांनी पोलिसांना सगळी माहिती दिली असून, त्यांची पोलीस कोठडी वाढविण्याची गरज नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील सुधीर शहा यांनी केला.

मध्य प्रदेशातून शस्त्रे

मोहोळ खून खटल्यातील आरोपी धनंजय वटकर आणि सतीश शेडगे यांनी मध्य प्रदेशातून चार शस्त्रे मागवून आरोपींना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी तीन शस्त्रे जप्त करण्यात आली असून, उर्वरित शस्त्र शोधून, त्याच्या वितरकाचा शोध घ्यायचा आहे, असे तपास अधिकारी सुनील तांबे यांनी न्यायालयाला सांगितले.

आरोपी वकिलांचा बचाव खोडला

मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना शरण येण्यासाठी मदत करत असल्याचा आरोपी वकिलांचा दावा तपास अधिकाऱ्यांनी खोडून काढला. ‘मोहोळ खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींना शरण यायचे असल्याने आरोपी वकिलांनी सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम यांच्यासोबत संभाषण केले. त्यावेळी त्यांनी आरोपींना नवी मुंबई किंवा कोणत्याही पोलीस ठाण्यात हजर होण्याचा सल्ला दिला होता. तरीही ते विरुद्ध दिशेला का पळाले, कात्रज परिसरात दोन पोलीस चौक्या होत्या, नाकाबंदीही सुरू होती. तिथे सांगून खून प्रकरणातील आरोपींना अटक करता आली असती,’ असे तांबे यांनी न्यायालयात सांगितले.

हेही वाचा >>>उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती; पण प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप निराधार

न्यायालय पक्षकार आणि पोलिसांचेही

शरद मोहोळ खून प्रकरणात दोन आरोपी वकिलांना सुनावणीसाठी हजर केले जाणार असल्याने न्यायालयात वकिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावर ‘न्यायालय हे वकिलांसोबत पक्षकार आणि पोलिसांचेही आहे, याचे भान सर्वांनी ठेवावे,’ असे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी सुनावले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was a failed assassination attempt on notorious gangster sharad mohol in octoberpune print news vvk 10 amy