पुणे : कल्याणीनगर अपघातातील पोर्श मोटारीमध्ये अपघात घडला त्यावेळी कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, असा प्राथमिक निष्कर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) काढला आहे. या मोटारीची तपासणी आरटीओने केल्यानंतर पोर्श कंपनीच्या तंत्रज्ञांच्या पथकानेही सोमवारी तपासणी पूर्ण केली. याबाबतचा अंतिम अहवाल आरटीओकडून दोन ते तीन दिवसांत पोलिसांकडे सादर केला जाणार आहे.
कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श मोटार चालवून अपघात केला होता. त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला होता. यातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी पोर्श मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचा दावा आधी केला होता. तांत्रिक बिघाडामुळे आरटीओमध्ये मोटारीची नोंदणी प्रकिया होऊ शकली नाही आणि दिल्लीच्या ग्राहक मंचात या प्रकरणी खटला दाखल केल्याचेही त्यांनी म्हटले होते. सध्या ही मोटार येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली आहे. अपघातानंतर आरटीओच्या पथकाने या मोटारीची नुकतीच तपासणी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्श मोटारीच्या प्राथमिक तपासणीत आरटीओच्या पथकाला कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नाही. ही मोटार परदेशी कंपनीची असल्याने त्यामुळे त्यांच्या तंत्रज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार पोर्शचे तंत्रज्ञांचे पथक सोमवारी पुण्यात दाखल झाले. या पथकाने मोटारीची तपासणी केली. यावेळी आरटीओचे अधिकारीही उपस्थित होते. आता पोर्शच्या तंत्रज्ञांच्या तपासणीच्या आधारावर आरटीओचे अधिकारी दोन ते तीन दिवसांत पोलिसांना अंतिम अहवाल सादर करणार आहेत.
अपघातानंतर आरटीओची तपासणी आवश्यक
एखाद्या प्राणांतिक अपघातानंतर आरटीओकडून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची तपासणी केली जाते. ही तपासणी करून आरटीओकडून पोलिसांना अहवाल सादर केला जातो. त्यात वाहनाची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र आणि नोंदणीची तपासणी केली जाते. याचबरोबर वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे अथवा रस्त्यावरील खराब स्थितीमुळे अपघात घडला, याचीही माहितील आरटीओकडून पोलिसांना दिली जाते.