पुणे : माध्यमिक शाळेतील घटत्या विद्यार्थिसंख्येमुळे नूतन मराठी विद्यालयाची प्राथमिक शाळाही आता नूमवि प्रशालेतच भरविण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार असून, शहरातील मराठी शाळांमधील घटत्या विद्यार्थिसंख्येचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
नूतन मराठी विद्यालय (नूमवि) १४१ वर्षे जुने आहे. मोठा लौकिक असलेल्या या शाळेने अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले. मात्र, गेल्या दोन दशकांत पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढलेला प्रचंड ओढा नूमविसारख्या ख्यातनाम शाळेलाही मारक ठरू लागला आहे.
नूमवि प्राथमिक शाळेचे अप्पा बळवंत चौकात केळकर रस्त्याच्या सुरुवातीला स्वतंत्र आवार आहे. तेथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. हे सर्व वर्ग यंदापासून बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेच्या आवारात भरतील. त्यामुळे आता एका सत्रात प्राथमिक, तर एका सत्रात माध्यमिक अशी दोन सत्रांत शाळा भरेल. ‘नूमवि’च्या पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांना अजूनही चांगला प्रतिसाद आहे. मात्र, पाचवीपासूनची विद्यार्थिसंख्या कमालीची रोडावली आहे. अनेक विद्यार्थी चौथीनंतर वेगळ्या शाळांत प्रवेश घेतात, अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर, दोन्ही शाळा एकाच आवारात भरल्यास चौथीनंतर होत असलेली विद्यार्थिगळती थांबवता येऊ शकेल, असा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शाळेच्या पहिली ते चौथीच्या इयत्तांत मिळून ६८१ विद्यार्थी आहेत. एका इयत्तेसाठी चार वर्ग असून, प्रत्येक वर्गात किमान ४० विद्यार्थी आहेत. काही इयत्तांत तर एकेका वर्गात ५० विद्यार्थीही असून, सध्या पहिलीसाठी नवीन प्रवेश सुरू आहेत. पाचवी ते दहावी इयत्तांत मात्र मोठी प्रवेशक्षमता असूनही संख्या कमी आहे. काही काळापूर्वीपर्यंत पाचवी ते दहावीसाठी शाळेत प्रत्येक इयत्तेसाठी आठ वर्ग होते. प्रत्येक वर्गात ६० याप्रमाणे एका इयत्तेतच जवळपास ५०० विद्यार्थी असत. आता पाचवी ते दहावी मिळून जेमतेम ७०० विद्यार्थी आणि प्रत्येक इयत्तेसाठी तीनच वर्ग राहिले आहेत. त्या मानाने अकरावी आणि बारावीला चांगला प्रतिसाद असून, दोन्ही इयत्तांत मिळून सुमारे १७०० विद्यार्थी आहेत.
‘पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असल्याने मराठी शाळांना प्रतिसाद कमी झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, विविध उपक्रम आयोजून हा प्रतिसाद वाढविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक शाळेत केलेल्या प्रयोगांना चांगले यश मिळाल्याने तेथील विद्यार्थिसंख्या टिकून आहे,’ असे नूमविचे शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले.
प्राथमिक शाळेच्या आवारात काय होणार?
प्राथमिक शाळा आता प्रशालेच्या आवारात जाणार असल्याने प्राथमिक शाळेच्या आवाराचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. या शाळेच्या आवारात चारेक दशकांपूर्वी बाग आणि लहान मुलांसाठी खेळणी होती. मात्र, नंतर तेथे इमारत बांधली गेली. आता शाळाच स्थलांतरित होते आहे. नूमविची पालकसंस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीने याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, प्राथमिक शाळेच्या स्थलांतराच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.
इतर शाळांनाही फटका
मराठी शाळांना मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचा फटका इतरही नामांकित शाळांना बसला आहे. सेवासदन संस्थेच्या कै. सौ. सुंदराबाई राठी मुलींच्या प्रशालेतील विद्यार्थिनीसंख्याही घटली आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन यांनी दिली. शाळेची पाचवी ते बारावीची मिळून प्रवेशक्षमता ८०० असूनही जेमतेम निम्म्या जागा भरलेल्या आहेत. ‘संस्थेच्या सोलापूरमधील मराठी शाळेला मात्र चांगला प्रतिसाद असून, तेथे प्रवेशासाठी चुरस असते,’ असे पटवर्धन म्हणाले. दरम्यान, पटसंख्येअभावी अनेक शाळांत शिक्षकांवरही टांगती तलवार असून, काही मराठी शाळांत तर शिक्षकांनाच विद्यार्थी आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.