लोकांना कृती करण्यास आणि नवीन शोध लावण्यास वाव दिला, तर ग्रामीण भागाच्या विकासात मोठा फरक पडेल, असे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘टेक फॉर सेवा’ या उपक्रमाची माहिती देताना ते बोलत होते.
विज्ञान भारती, सेवा सहयोग, ग्लोबल इंडियन सायन्टिस्ट्स अॅण्ड टेक्नोक्रॅट्स (जिस्ट) फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्यातर्फे ‘सोशिओ-टेक्निकल कॉन्फरन्स ऑन इनक्लुझिव्ह अॅण्ड सस्टेनेबल सोशिअल डेव्हलपमेन्ट’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय परिषद पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २८ आणि २९ सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती डॉ. काकोडकर यांनी दिली.    
कंपन्या, सेवाभावी संस्था आणि शास्त्रज्ञ यांना एकत्रिकपणे समाजकार्य करता यावे यासाठी ही परिषद हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे सामाजिक बदल करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या मार्फत करण्यात येणार आहे, असेही डॉ काकोडकर म्हणाले. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जगन्नाथ वाणी आणि एफ. सी. कोहली यांसारखे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे अभ्यासक या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader