पुणे : आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. विमानतळावर थर्मल स्कॅनरच्या सहाय्याने प्रवाशांचा ताप तपासला जात आहे. संशयास्पद रूग्ण आढळून आल्यास त्यांच्या विलगीकरणासाठी महापालिकेने नायडू संसर्गजन्य काही खाटा राखीव ठेवल्या आहेत.
जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संकट घोषित केले. यानंतर मंकीपॉक्स संसर्गाचा वेग लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य विभागांना दक्ष करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.
हेही वाचा >>>मोठी बातमी! MPSC ची २५ ऑगस्टला होणारी परीक्षा लांबणीवर.. कधी होणार परीक्षा?
पुणे विमानतळावर दुबईतून दररोज आणि सिंगापूर एक दिवसाआड विमाने येतात. एका विमानातून सुमारे दीडशे प्रवासी येतात. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या या प्रवाशांची तपासणी विमानतळ आरोग्य संघटनेच्या पथकाकडून केली जात आहे. थर्मल स्कॅनरच्या साहाय्याने प्रवाशांचा ताप मोजला जात आहे. ताप असल्यास त्या रूग्णांमध्ये अंगावर पुरळ आणि मंकीपॉक्सची इतर लक्षणे तपासली जात आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाशी समन्वय साधण्याची सूचना देण्यात आली आहे.
पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी २० ऑगस्ट रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी नायडू संसर्गजन्य रुग्णालयात १० खाटा राखीव ठेवल्या आहेत. विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात महापालिकेचा आरोग्य विभाग सातत्याने आहे.- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका