रात्रीची वेळ. ‘तो’ मोबाइलवर फेसबुक उघडून बसला होता. अचानक त्याला एक मेसेज आला- ‘मी तुझा भाऊ आहे. मला फोन कर.’ चक्रावलेल्या त्याने मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर लगेच फोन केला. पलीकडचा आवाज खरोखरच त्याच्या भावाचा होता. तब्बल अकरा वर्षांनी ते भेटत होते, तेही फेसबुकवर.. संतोष डोमले आणि गुरुबाज सिंग या भावांची ही गोष्ट. गुरुबाज सिंगचे मूळ नाव अंकुश डोमले. एखाद्या चित्रपटाची गोष्ट वाटत असली तरी ती प्रत्यक्षात घडली.
अंकुश अकरा वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याचा अंकुशच्या मनावर मोठा परिणाम झाला. तो शक्य तेवढा वेळ घराबाहेर राहू लागला. तेरा वर्षांचा असताना त्याने त्यांच्या काकांची दुचाकी चालवली आणि दुचाकीला अपघात झाला. दुचाकीची झालेली दुरवस्था पाहून काका रागावले आणि त्यांनी अंकुशच्या आईकडे तक्रारही केली. आईने रागाच्या भरात अंकुशसमोर पन्नास रुपये फेकले आणि त्याला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. ते पन्नास रुपये घेऊन अंकुश बाहेर पडला तो घरी परत न जाण्याच्या इराद्यानेच.
पुण्यातील रस्त्यावर भटकताना त्याला एका शीख ट्रकचालकाने पाहिले. त्याची विचारपूस केली आणि त्याला आपल्याबरोबर येण्यास सांगितले. तो ट्रक मुंबईहून नांदेडला चालला होता. ट्रकचालकाने अंकुशला त्याच्या घरी पंजाबला येण्यास सुचवले. अंकुशने नकार दिल्यावर त्याने त्याला नांदेडच्या गुरुद्वारात उतरवले. अंकुश गुरुद्वाराच्या ‘लंगर’मध्ये काम करू लागला. काही दिवसांपूर्वी लुधियानाच्या प्रमुख गुरुद्वारामध्ये काम करणाऱ्या मेजर सिंग यांनी अंकुशचे काम पाहून त्याला लुधियानाला नेले. तेथे अंकुशने स्वखुशीने स्वत:चा धर्म बदलला आणि तो ‘गुरुबाज सिंग’ झाला. या मधल्या अनेक वर्षांत त्याला घरी जावेसे वाटले नव्हते. पण नुकतेच २१ जुलैला त्याचे एका सहकाऱ्याबरोबर भांडण झाले. त्याला एकदम संतोषची, त्याच्या भावाची आठवण झाली. त्याने संतोषला फेसबुकवरून शोधून काढले. फेसबुकवर त्याने संतोषशी संपर्क साधला आणि ते एकमेकांशी बोलले.
डोक्यावर पगडी, वाढवलेली दाढी या अवतारामुळे अंकुशला संतोषने फेसबुकवर ओळखलेच नाही. पण त्यांच्या आईने – हेमलता डोमले यांनी – अंकुशला ओळखले. अंकुशने लुधियानाच्या गुरुद्वारातील शीख बाबाजींना आपली गोष्ट सांगताच त्यांनी झेलम एक्स्प्रेसने त्याची पुण्याला रवानगी केली. अन् ११ वर्षांनी तो घरी पोहोचला. अंकुशचा आता पुण्यातच राहण्याचा विचार आहे. नाव आणि धर्म बदलल्याचा पश्चात्ताप नसल्याचे तो सांगतो. अंकुश आता गुरुबाज म्हणूनच त्याच्या भावाच्या व्यवसायात त्याला साथ देणार आहे.

Story img Loader