पुणे : ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या सराइताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्याच्याकडून १६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. घरफोडी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध ५० गुन्हे दाखल असून, न्यायालयाकडून जामीन मिळवून तो नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने भोरमधील श्रीपतीनगर भागात चार घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले.

लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (वय ३१ रा. मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर उपस्थित होते.

भोर शहरातील श्रीपतीनगर भागात एकाच वेळी चार बंद घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याची घटना १३ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. पोलिसांनी श्रीपतीनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. घरफोडी करण्यापूर्वी पाच ते सहा आधी माने तेथे येऊन गेला होता. त्याने बंद घरांची पाहणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. माने मोटारीतून शिरवळकडून पुण्याकडे निघाल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. ससेवाडी परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. माने याच्याकडे असलेल्या आधाराकार्डवर लखन अशोक कुलकर्णी असे नाव आहे. तो सचिन माने या नावाने वावरतो. त्याच्याकडून ऐवज, मोटार असा १६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धीरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी ही कामगिरी केली.

गुजरात, कर्नाटकात घरफोड्या

आरोपी मानेने गुजरात, कनार्टक, महाराष्ट्रात घरफोडीचे गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकमध्ये चोरी केल्यानंतर न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Story img Loader