पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. चोरट्याने सराफी पेढीतून सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, त्याच्याकडून तीन लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कपिल जयराम चव्हाण (वय ३९, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता भागातील धायरी परिसरातील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने चोरट्याने सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली होती. चव्हाण वाढदिवसानिमित्त सोनसाखळी खरेदी करायची आहे, अशी बतावणी करुन सराफी पेढीत शिरायचा.

हेही वाचा >>> पुणे : बांधकाम विभाग झाला ‘सतर्क’, थांबविली १०५ प्रकल्पांची कामे, नक्की काय आहे प्रकार ?

पेढीतील आरशासमोर थांबून तो सोनसाखळी परिधान करायचा. कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची साधून सराफी पेढीसमोर लावलेल्या दुचाकीवरुन तो पसार व्हायचा. महिनाभरात अशा प्रकारच्या तीन ते चार घटना घडल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चव्हाणने खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. चव्हाण कोथरूड भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, संजय शिंदे, अण्णा केकाण, उत्तम तारू, पंकज देशमुख, देवा चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Story img Loader