कासारवाडी येथील एका सदनिकेमध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घरफोडी करताना नागरिकांनी सतर्कपणे एका चोरटय़ाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. पण तो चोरटा चार तासांतच भोसरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
रशीद हमीद शाह (वय ३२, रा. नायगाव. जि. अकोला)असे पळून गेलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील शेळके अपार्टमेंटमधील रत्नमाला बडगुजर यांच्या सदनिकेत शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास एक चोरटा शिरला. घरात चोर शिरल्याचे लक्षात येताच बडगुजर यांनी मोठय़ा सतर्कतेने घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला व नागरिकांना त्याची माहिती दिली. नागरिकांनी त्या चोरटय़ाला पकडला व चांगला चोप दिला. त्याबरोबरच या घटनेची माहिती भोसरी पोलिसांना दिली.
चोरटय़ाला भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला भोसरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे हा चोरटा हातातील बेडी काढत असल्याचे पोलीस कर्मचारी पी. बी. तापकीर यांनी पाहिले. त्यामुळे तापकीर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरटय़ाने त्यांना लाथ मारली. त्यामुळे ते खाली पडले. तापकीर यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोवर हा चोरटा पुणे-नाशिक रस्त्याच्या दिशने पळून गेला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पवार हे अधिक तपास करत आहेत.