कोल्हापुरात खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून पुण्याच्या रविवार पेठेतील कापड व्यापाऱ्याला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात व्यापाऱ्याला कापडी पिशवीत सोन्याप्रमाणे दिसणाऱ्या पिवळ्या रंगाची धातुची नाणी देऊन चोरटे पसार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका व्यापाऱ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कापड व्यापारी आहेत. त्यांचे रविवार पेठेत कापड दुकान आहे. एक महिला आणि दोन साथीदार त्यांच्या दुकानात आले. चोरट्यांनी खरेदीचा बहाणा केला. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती तुम्हाला स्वस्तात देतो अशी बतावणी कापड व्यावसायिकाकडे केली.

पिवळ्या रंगाची धातुची नाणी देऊन चोरटे पसार

चोरट्यांनी केलेल्या बतावणीवर व्यावसायिकाने विश्वास ठेवला. सोन्याच्या नाण्यांसाठी ११ लाख रुपये द्यावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यावर व्यापाऱ्याने त्यांना ११ लाख रुपये देऊन व्यवहार ठरवला. चोरट्यांनी त्यांना पिवळ्या रंगाची धातुची नाणी एका पिशवीतून दिली. यानंतर व्यावसायिकाकडून पैसे घेऊन चोरटे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा : पुण्यात विवाहासाठी स्थळ दाखवण्याचं आमिष देऊन ज्येष्ठाला १६ लाख रुपयांचा गंडा

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief cheated for 11 lakh to businessman on the name of gold coin in pune print news pbs