पुणे : शहरातील विविध भागांत जबरदस्तीने मोबाइल हिसकावणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला वानवडी पोलिसानी अटक केली. शरद मंजुनाथ (वय २२, रा. शिमोगा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. चोरट्याकडून एक दुचाकी व चोरीचे मोबाइल, असा ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मंजुनाथ आणि त्याचे साथीदार हे कर्नाटक येथील असून, ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी शहरात टोळीने जबरी चोरीचे गुन्हे करत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंजुनाथ हा शहरात रंगकाम करतो. मात्र, त्या आडून तो नागरिकांचे मोबाइल हिसकावत होता. चार दिवसांपूर्वी लुल्लानगर येथील परिसरात एका व्यक्तीचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला होता. याप्रकरणी, वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला होता.
हेही वाचा – कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये?
हेही वाचा – बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ
पोलिस कर्मचारी सचिन पवार आणि उत्रेश्वर धस यांना मिळालेल्या माहितीवरून मंजुनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, गुन्हे निरीक्षक संदीप शिवले उपनिरीक्षक अजय भोसले कर्मचारी विनोद भंडलकर, संतोष नाईक, महेश गाढवे, अमोल गायकवाड, सचिन पवार यांच्या पथकाने केली.