पुणे : रस्त्यावर लावलेल्या मोटारींची काच फोडून ऐवज, तसेच लॅपटाॅप चोरणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. चोरट्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. तामिळनाडूतील चोरट्यांच्या टोळीने शहर, परिसरात मोटारीचे काच फोडून ऐवज चोरीचे ११ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्याकडून दोन लॅपटाॅप जप्त करण्यात अले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेशकुमार पांडुरंगन सेरवई (वय ५०, रा. तामिळनाडू) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सेरवईचे दोन साथीदार पसार झाले आहेत. सेरवई आाणि साथीदारांनी स्वारगेट, खडक, चंदननगर, डेक्कन, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ गुन्हे केल्याचे तपासात उघकीस आले आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारींच्या काचा फोडून रोकड, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. सर्वाधिक घटना स्वारगेट परिसरात घडल्या होत्या. स्वारगेट पोलीस ठाण्यात मोटारींची काच फोडून ऐवज चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदीबागेत’ भेटी-गाठींना जोर

हेही वाचा – मोबाइल चार्जर पाच लाखांना, सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासात चोरट्यांनी चोरलेला लॅपटाॅपचा वापर बंगळुरूतील एक जण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक बंगळुरूत पोहाेचले. सेरवईला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने पुण्यात मोटारींची काच फोडून लॅपटाॅप, रोकड असा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, दिनेश भांदुर्गे, प्रतीक लाहिगुडे, तनपूरे, आदी पोलिसांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief from tamil nadu steals money by breaking car glass in pune arrested pune print news rbk 25 ssb