पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यातून चोरलेली दुचाकी ते बीडमध्ये सोडून परत पुण्यात यायचे. चोरट्यांनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दत्ता शिवाजी दहिफळे (वय १८, सध्या रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. मारुतीची पांगरी,पाटोदा, जि.बीड), बाबुराव धर्मराज तोंडे (वय १८ रा. आंबेगाव, ता. किल्ले धारूर, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.
हेही वाचा…. पिंपरीतील रावेत भागात वादळी वाऱ्यासह पाऊस; झाड पडल्याच्या घटना
चौकशीत दोघांनी शहर परिसरातून दहा दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपयांच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहीद शेख आदींनी ही कारवाई केली.