पुण्यात क्वीन्स गार्डन परिसरातील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभातून वधू पक्षाकडील साडेपाच लाख रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज ठेवलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. यानंतर वऱ्हाड्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि चोरट्यांचा शोध सुरू झाला. मात्र, चोरट्यांसह रोकड आणि दागिने सापडलेच नाहीत.

याबाबत वधू्च्या भावाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार संगणक अभियंता असून एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत ते कामाला आहेत. त्याच्या बहिणीचा विवाह क्वीन्स गार्डन परिसरातील एका मंगल कार्यालयात पार पडला. त्या निमित्ताने स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंचावर छायाचित्र काढण्यासाठी जाताच चोरी

तक्रारदाराने पिशवीत साडेपाच लाखांची रोकड, दागिने, मोटारीच्या चाव्या ठेवल्या होत्या. स्वागत समारंभ सुरू असताना त्यांना मंचावर छायाचित्र काढण्यासाठी बोलाविण्यात आले. धावपळीत त्यांनी पिशवी खुर्चीवर ठेवली. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवी लांबविली.

हेही वाचा : पुणे : गुंड अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, सबळ पुराव्यांअभाव्यी नऊ जणांची निर्दोष मुक्तता

या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader