लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने गजाआड केले. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सराफी पेढीत ही घटना घडली होती.
मनोज उर्फ मन्या तुकाराम सुर्यवंशी (वय २३, रा. धायरी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सराफी पेढीच्या मालकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार सराफ व्यावसायिक ७८ वर्षीय आहेत. ८ डिसेंबर रोजी बी. टी. कवडे रस्त्यावरील बोराटे वस्तीमधील एका सराफी पेढीत ही घटना घडली होती. तक्रारदार रात्री साडेआठच्या सुमारास दिवसभरातील हिशेब करत होते. त्यावेळी आरोपी मन्या सूर्यवंशी आणि त्याचे साथीदार सराफी पेढीत शिरले. त्यांनी सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखविला, त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. पेढीतील ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून दोघे जण पसार झाले.
आणखी वाचा-हवाई प्रवाशांना खुशखबर ! पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेत वाढ
याप्रकरणाचा गु्न्हे शाखेच्या युनिट पाचकडून समांतर तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार सूर्यवंशीला ताब्यात घेतले. चौकशीत सूर्यवंशी आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी सराफी पेढीत दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस कर्मचारी प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख यांंनी ही कामगिरी केली.