लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : बालेवाडी भागातील एका सोसायटीतील सदनिकेत घरफोडी करण्यासाठी आलेला चोरटा पहिल्या मजल्यावरुन पडला. पंधरा ते वीस फुटावरुन चोरटा सोसायटीच्या आवारात पडल्याने जखम झाला. चोरट्याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बप्पा सरकार (वय ३२, सध्या रा. मुंबई) असे जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका रहिवाशाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बालेवाडी भागातील इयॉन सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीत पहिल्या मजल्यावरील सदनिकेत ते राहायला आहेत. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास सरकार सोसायटीच्या आवारात शिरला. सोसायटीतील पाइपच्या आधारे तो पहिल्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतील गॅलरीत उतरला. आवाज‌ झाल्याने तक्रारदार झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गॅलरीतून डोकावून पाहिले.

आणखी वाचा-पुण्यातील रस्त्याची राष्ट्रपतींनी घेतली दखल! राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या सूचना

तक्रारदार जागे झाल्याचे पाहून सरकार पाइपवरुन उतरून पसार होण्याचा प्रयत्नात असताना तो पंधरा ते वीस फुटावरुन कोसळला. सोसायटीच्या आवारात सरकार पडला. तक्रारदाराने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले. रखवालदाराने सरकारला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जखमी अवस्थेतील सरकाराला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चाळले तपास करत आहेत.

शहरात महिनाभरापासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद सदनिकांची पाहणी करुन चोरटे ऐवज लांबवून पसार होतात. उपनगरातील सोसायट्यांमध्ये घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढते आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieve came for robbery and fell from first floor in balewadi pune print news rbk 25 mrj