पुणे : सॅलिसबरी पार्क परिसरात अपघात झाल्याची बतावणी करुन मोटारचालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. राेहित सूर्यकांत कांबळे (वय २१), सागर शिवानंद जळकुटे (वय २४, दोघे रा. ओैद्योगिक वसाहत, गुलटेकडी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सॅलिसबरी पार्क परिसरातून मोटारीतून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन कांबळे आणि जळकुटे आले. त्यांनी मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटारीचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी मोटारचालक व्यावासयिकाला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. अपघात झाल्याची बतावणी करुन मोटारचालकाकडे नुकसान भरपाईपोटी पैशांची मागणी केली. मोटारचालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी कांबळे आणि जळकुटे पसार झाले. व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. मोटारचालकाला लुटणारे चोरटे गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुजय पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल काेलंबीकर, उपनिरीक्षक संतोष तानवडे, रवींद्र कस्पटे, नितीन वाघेला, सुजय पवार, संदीप घुले, दीपक खेंदाड, फिरोज शेख, शैलेश वाघमोडे, हनुमंत दुधे यांनी ही कारवाई केली.