लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेली, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत. ते गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील फलाट क्रमांक नऊ परिसरात थांबले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. सोनसाखळी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.

आणखी वाचा-जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की

छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात राहायला आहेत. त्या दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड, मोबाइल संच असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला. पोलीस हवालदार बोरकर तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील एसटी स्थानकाच्या आवारातून प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढतात.

आणखी वाचा-पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !

एसटी स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर

दिवाळीत एसटी स्थानकांच्या परिसरात गर्दी असते. शहरात वास्तव्यास असणारे विद्यार्थी, नोकरदार गावी जातात. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात ऐवज चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागतात. एसटी स्थानकाच्या आवारात पोलिसांचा वावर नसतो. एसटी स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याच्या तक्रार करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves at st station increase in incidents of theft from commuters during diwali pune print news rbk 25 mrj