पुणे : कर्वेनगर भागातील एका सोसायटीतील चार सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या सोसायटीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मार्केट यार्ड, तसेच भारती विद्यापीठ भागातील सदनिकेचे कुलुप तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा >>> अवैध व्यवसाय करणारे आठ गुन्हेगार तडीपार
कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील पार्वती अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. चोरटे मंगळवारी रात्री सोसायटीत शिरले. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडले. सदनिकेतून एक लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याच सोसायटीतील चार सदनिकांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
हेही वाचा >>> शहरबात : ‘मिशन ३२’ मोहीम फत्ते होणार कशी? वाहने ३९ लाख; वाहतूक पोलीस अवघे ९००
मार्केट यार्डमधील भिमाले गार्डन परिसरात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत एका महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला अर्चना पार्क सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (१३ ऑगस्ट) सकाळी अकराच्या सुमारास त्या सदनिका बंद करून बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून दोन लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत. भारती विद्यापीठ भागातील आंबेगाव परिसरात सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोकड, तसेच दागिने असा ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार आंबेगाव परिसरातील तोरणा संकुलात राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस हवालदार गोरे तपास करत आहेत.