मिठाई विक्री दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याबाबत मिठाई विक्रेते सैतानसिंग सवाईसिंग देवडा (वय ४८, रा. एकता हाऊसिंग सोसायटी, गोल्फ क्लब रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवडा यांचे गोल्फ क्लब रस्त्यावर नारायण स्वीट मार्ट मिठाई विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. दुकानात प्रवेश करुन चोरट्यांनी गल्ला उचकटला.
हेही वाचा >>> रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी – डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा
गल्ल्यातील आठ हजार ७०० रुपये आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरुन चोरटे पसार झाले. गुरुवारी सकाळी देवडा दुकाना उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानाचे कुलूप उचकटल्याचे लक्षात आले. गल्ल्यातील रोकड आणि बर्फी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर देवडा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस नाईक मदने तपास करत आहेत. शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्या सोसायटीत रखवालदार आणि सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा सोसायटीतील सदनिका, तसेच दुकानांची पाहणी करून चोरटे चोरी करतात.