इंदापूर : इंदापूर परिसरातील माळवाडीत दरोडा घालून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून पावणे नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सागर अरुण राऊत (रा. टेंभुर्णी), दादा बळी शेंडगे (रा. इंदापूर) यांना अटक करण्यात आली आहे. इंदापूरजवळ असलेल्या माळवडीतील क्षीरसागर वस्तीत राऊत आणि शेंडगे यांनी दरोडा घातला होता. दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून आठ लाख ७५ हजारांचे दागिने लुटले होते.
हेही वाचा >>> पुणे : शहरात आजही पावसाची शक्यता
अशोक अंकुश व्यवहारे यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार राऊत आणि शेंडगे यांना सापळा लावून पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आणि पथकाने ही कारवाई केली.