पुणे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी नागरिकांकडील मोबाइल संच, दागिने रोकड असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली. शहरातील चोऱ्या, लूटमार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या असतानाच लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

कोंढव्यातील येवलेवाडी भागात दूध वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने त्याच्याकडील १५ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. याबाबत सतीश महादेव पाटील (वय ३०, रा. ट्युलीप अपार्टमेंट, नऱ्हे, आंबेगाव) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (२२ जून) पहाटे साडेचारच्या सुमारास पाटील दूधाचे कॅन घेऊन सासवडकडे निघाले होते. येवलेवाडीतील के. जे. काॅलेजजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी पाटील यांना अडवले. त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. पाटील यांच्याकडील १५ हजारांची रोकड लुटून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोंढवा भागात पादचारी महिलांकडील पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. तासाभरात दोन महिलांना लुटण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या.

हेही वाचा – पुणे : उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांची भूरळ, फळबाजारात दररोज १२ टन आवक

आपटे रस्त्यावर तरुणाचा मोबाइल संच चोरीला

डेक्कन जिमखाना भागातील आपटे रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल संच चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत गौरव विनयकुमार जयस्वाल (वय ३४, रा. वेंदांत सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ जून रोजी जयस्वाल आपटे रस्त्यावरील रामी ग्रँड हाॅटेलसमोर मोबाइलवरुन एका ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीची माहिती घेत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी जयस्वाल यांच्याकडील मोबाइल संच चोरून नेला. दुचाकीच्या वाहन पाटीवर क्रमांक नव्हता. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा – आळंदी : इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली; काही तासांवर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा!

बेकरीत शिरून महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न

दुकानात चाॅकलेट खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्याने एका महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्याने चोरटा पसार झाल्याची घटना धायरीतील गारमाळ परिसरात घडली. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची धायरी भागात बेकरी आणि किरकोळ वस्तू विक्रीचे दुकान आहे. रविवारी (२३ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरुन दोन चोरटे आले. चोरट्यांनी महिलेकडे चाॅकलेट मागितले. त्यावेळी दुकानात महिला आणि तिचा लहान मुलगा होता. महिला चोरट्यांना चाॅकलेट मोजून देत होत्या. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा करून चोरट्यांना प्रतिकार केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.