लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरू आहे. राज्यभरातून लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. मात्र, या सोहळ्या दरम्यान चोरट्यांनी काही भाविकांचे दागिने, रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सारिका सतीश जोशी (वय ६५, रा. पालघर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी यांची इंद्रायणी घाट आळंदी येथून २९ हजार २०० रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. त्याचबरोबर कल्पना किशोर पाटील यांचे २५०० रुपये आणि एक लाख १० हजार रुपये किमतीचे १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, वैभवी नितीन तांडेल यांचे सहा हजार ५०० रूपये रोख आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, कल्पना किशोर तरे यांची पाच हजार २०० रूपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. या सर्व घटना मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ या कालावधीत घडल्या. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

आणखी वाचा-पुणे : बंदुकीच्या दुकानातून २० काडतुसे, ३२ बोअरची चोरी, दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

दरम्यान, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज,ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. वारकऱ्यांच्या उपस्थितीतीने इंद्रायणी नदीकाठ फुलून गेला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves in sant dnyaneshwar samadhi sohala pune print news ggy 03 mrj