झारखंडमधील चोरट्यांच्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून दीड कोटी रुपयांचे महागडे १९७ मोबाइल संच, तीन लॅपटॅाप, सात आयपॅड असा एक कोटी ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अब्दुल हाय अबुजार शेख (वय २०), अबेदुर मुकजुल शेख (वय ३४), सुलतान अब्दुल शेख (वय ३२), अबुबकर अबुजार शेख (वय २३), राबीदुल मंटू शेख (वय २२, सर्व मूळ रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपी सध्या चाकण परिसरात राहायला आहेत. झारखंडमधील चोरट्यांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनायक साळवे, कैलास साळुंके आणि साई रोकडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून चोरट्यांना लोणीकंद-केसनंद रस्त्यावर पकडले.

१९७ मोबाइल संच, लॅपटॅाप, आयपॅड असा मुद्देमाल –

चोरट्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी वाघोलीतील एक गोदाम फोडून महागडे मोबाइल संच लांबविल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून १९७ मोबाइल संच, लॅपटॅाप, आयपॅड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक मारुती पाटील, सहायक निरीक्षक गजानन जाधव, निखील पवार, उपनिरीक्षक सूरज गोरे, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, सागर जगताप, समीर पिलाणे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader