पुणे : ज्येष्ठ महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेकडील दोन लाख रुपयांची सोन्याची माळ हिसकावून नेल्याची घटना वारजे भागात घडली. ज्येष्ठ महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याची ही पाचवी घटना आहे.

याबाबत एका ८० वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला वारजे माळवाडीतील दिगंबरवाडीत राहायला आहेत. ७ एप्रिल रोजी त्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोर असलेल्या ओट्यावर बसल्या होत्या. त्या मुलीसोबतमोबाइलवरुन बोलत होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन दोन चोरटे आले. चोरट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी गळ्यातील दोन लाख रुपयांची सोन्याची माळ हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

ज्येष्ठांमध्ये घबराट

टिळक रस्त्यावर पीएमपी थांब्यावर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (११ एप्रिल) रात्री घडली. सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यान, रविवार पेठ, तसेच गोखलेनगर भागात ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. आठवड्याभरात पाच घटना घडल्याने ज्येष्ठांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पादचाऱ्यांना लुटणे, महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘काॅप्स २४ ’ ही योजना सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरी

सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती मंदिराजवळ प्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची माळ चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ८२ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (१२ एप्रिल) हनुमान जन्मोत्सव होता. भिकारदास मारुती मंदिरासमोर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. रात्री आठच्या सुमारास तक्रारदार ज्येष्ठ महिला रांगेत थांबल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची माळ चोरुन नेली. पोलीस हवालदार एस. व्ही. पाटील तपास करत आहेत.