पुणे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. कात्रज भागातील सावंत विहार सोसायटी परिसरातून जात असलेल्या पादचारी महिलेच्या हातातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत. हडपसर भागात एका प्रवाशाला मोटारचालकाने लुटल्याची घटना घडली. याबाबत नवनाथ झाडे (वय ३४, रा. ओंकार काॅलनी, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे बाहेरगावी निघाले होते. सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात ते बसची वाट पाहत थांबले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक मोटारचालक तेथे आले. कोठे निघाला, अशी विचारणा मोटारचालकाने केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना मोटारीतून मूळगावी सोडण्याची बतावणी केली. चोरट्याने त्यांना मोटारीत धमकावले. त्यांना चाकूचा धाक दाखविला. झाडे यांच्याकडील रोकड, दोन मोबइल संच तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा ५६ हजार रुपयांचा ऐवज मोटारचालकाने लुटला. झाडे यांना पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत परिसरात सोडून चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

हडपसरमधील मांजरी भागात एका पादचारी तरुणाचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत सुहास जाधव (वय २५, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव रात्री मांजरीतील ग्रीन सोसायटी परिसरातून जात होते. त्या वेळी चोरट्यांनी जाधव यांच्या हातातील आठ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक एम. जी. थोरात तपास करत आहेत.

Story img Loader