पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे अज्ञात चोरांनी चक्क एटीएम मशीन मोटारीत घालून पळवून नेल्याचे घटना समोर आली आहे. एटीएममध्ये १६ लाख ९६  हजार रोख रक्कम होती अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद होण्याच्या अगोदरच चोरांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला होता. त्यामुळे त्यात घटना कैद झाली नाही. अद्याप चोर फरार असून त्यांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील चंद्रश्री कॉप्लेक्स येथील गाळा क्रमांक 11 मध्ये असणारे एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिवसभर अज्ञात दोन चोरांनी टेहळणी केली, मध्यरात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओतून येत एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न चोरांनी केला. मात्र हा प्रयत्न फसल्याने चक्क एटीएमला दोरी गुंडाळून ते मोटारीत घालून पळवून नेले आहे.

एटीएममध्ये सीसीटीव्ही होता त्यावर चलाख चोरांनी स्प्रे मारला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे संबंधित घटना आणि अज्ञात व्यक्ती हे सीसीटीव्हीत कैद झालेले नाहीत. एटीएम मशीन आणि त्यामधील रोख रक्कम अशी १८ लाख ९८ हजार रुपये चोरांनी पळवून नेले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएम मशीन च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अनेकदा एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी मध्यरात्री सुरक्षा पुरवली जात नसल्याचे वारंवार समोर आले आहे. अज्ञात चोरांचा शोध चाकण पोलिस घेत आहेत.