लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्याकडील सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी गेल्या काही दिवसात हनुमान टेकडी परिसरात लूटमारीचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
स्वप्नील शिवाजी डोंबे (वय ३२, रा.जनता वसाहत, पर्वती पायथा), अनिकेत अनिल स्वामी (वय २१, मूळ रा. जनता वसाहत,पर्वती पायथा, सध्या रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. डोंबे आणि स्वामी सराइत चोरटे आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध डेक्कन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात लूटमारीचे गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आणखी वाचा-ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होताच त्यांच्या विरोधात पुण्यात लागले फ्लेक्स
चार दिवसांपूर्वी हनुमान टेकडीवर मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून डोंबे आणि स्वामी यांनी तिच्याकडील सोनसाखळी चोरली होती. याबाबत युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. डेक्कन पोलिसांच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. आरोपी गुन्हा करुन दुचाकीवरुन पसार झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरण,तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनंतर दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हनुमान टेकडी परिसरात लूटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. दोघांनी गेल्या काही महिन्यात या भागात लूटमारीचे चार गुन्हे केल्याचे तपासात निषन्न्न झाले. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार राजेंद्र मारणे, दत्तात्रय शिंदे, धनश्री सुपेकर, गभाले, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, महेश शिरसाठ यांनी ही कारवाई केली.
आणखी वाचा-मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा
टेकडीवर कोयता घेऊन फिरणारा अटकेत
हनुमान टेकडीवर कोयता घेऊन लुटणारीच्या तयारीत असलेल्या आणखी एका चोरट्याला डेक्कन पोलिसांनी पकडले. माॅण्टी उर्फ तेजस खराडे (रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खराडे साराइत चोरटा असून, त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता, डेक्कन, दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा-
दुचाकीवरील स्टीकरवरुन शोध
हनुमान टेकडीवर लूटमार करणारे चोरटे डोंबे आणि स्वामी यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी वापरली होती. आरोपी दुचाकीवरनु पसार झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात वाहन क्रमांक नसलेली दुचाकी पांडवनगर पोलीस चौकीवर आढळून आली होती. दुचाकीवर एक स्टीकर होते. स्टीकरवरुन पोलिसांनी चोरटे डोंबे आणि स्वामी यांचा माग कााढला.