पुणे : सिंहगड रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील ५० हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या कॅनाॅल रस्त्यावर ही घटना घडली.
हेही वाचा >>> स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवासी महिलेचे दागिने चोरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी दुचाकीस्वार तरुण शुक्रवारी रात्रीघरी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले. ‘गाडी हळू का चालवतोय’,अशी विचारणा करुन चोरट्यांनी त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. दुचाकीस्वार तरुणाला गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगितले. चोरट्यांनी त्याला शिवीगाळ केली. चोरट्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणाच्या खिशातील ५० हजारांची रोकड लुटून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत.