पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याची घटना विश्रामबाग वाड्यासमोर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत बिरदेव सिद्धप्पा डोणे (वय २६, सध्या रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोणे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. विश्रामबाग वाड्यासमोर असलेल्या एका इमारतीतील अभ्यासिकेतून ते सोमवारी (१० मार्च) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घरी निघाले होते. त्या वेळी राधिका भेळ दुकानासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी डोणे यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून घेतला. डोणे यांनी आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी विश्रामबाग वाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, हवालदार काठे तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या वर्षभरापासून पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून नेणे, तसेच धमकावून लुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेणे, तसेच मोबाइल चोरीचे १८२ हून जास्त गुन्हे दाखल झाले होते.

Story img Loader