पुणे : पादचारी महिलांकडील दागिने, तसेच मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नवी लोकमान्यनगर, तसेच पर्वती भागात पादचारी महिलांकडील दागिने चाेरुन नेल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी विश्रामबाग आणि पर्वती पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पर्वती परिसरातून निघाल्या होत्या. लक्ष्मीनगर परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी चोरुन नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.
हेही वाचा…अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना
नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला दांडेकर पूल भागात राहायला आहेत. लोकमान्यनगर भागातील जाॅगिग ट्रॅक परिसरातून त्या निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने चोरुन नेले. पोलीस कर्मचारी नलावडे तपास करत आहेत.
हेही वाचा…पुणे स्टेशनजवळ उपाहारगृहातील कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न, बंडगार्डन पोलिसांकडून दोघांना अटक
शहर तसेच परिसरात पादचारी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांना धमकावून मोबाइल चोरुन चोरटे पसार होतात. पादचाऱ्यांना धमकावून लुटण्याचे १६७ हून जास्त गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.