पुणे : सोनसाखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने सिंहगड रस्ता परिसरातील दोन सराफी पेढीत शिरलेल्या चोरट्यांनी सोनसाखळ्या गळ्यात घालून धूम ठोकली. धायरी आणि वडगाव बुद्रुक भागातील सराफी पेढीत ही घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> पुणे : मुदत ठेव मिळवण्यासाठी ज्येष्ठ दाम्पत्याचा ‘लढा’; २१ वर्षांनंतर मिळाली मुदत ठेवीची रक्कम
याबाबत दीपक वसंत पवार (वय ३२, रा. दीपाली अपार्टमेंट, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ नोव्हेंबर रोजी एक चोरटा ओम ज्वेलर्स या सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने आला. वाढदिवस असल्याने सोनसाखळी खरेदी करायची आहे, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्याने दोन सोनसाखळ्या गळ्यात घातल्या, सराफी पेढीतील आरशात त्याने सोनसाखळी घालून पाहिले. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधली आणि चोरटा पेढीबाहेर लावलेल्या दुचाकीवरुन पसार झाला.
हेही वाचा >>> कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी शहरांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्प आवश्यक
वडगाव बुद्रुक भागातील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्समध्ये अशीच घटना घडली. याबाबत सराफी पेढीचे मालक अशोक बन्सीलाल पटेल (वय २६, रा. श्रीगंगा गॅलेक्सी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पटेल यांच्या सराफी पेढीत चोरटा सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने शिरला. त्यावेळी चहा विक्रेता मुलगा पेढीत होता. चोरट्याने दुचाकी सुरू ठेवली होती. सोनसाखळी गळ्यात घालून चोरट्याने आरशात पाहिले. चहा विक्रेत्या मुलाने दुचाकी बंद करण्यास सांगितले. चोरटा दुचाकी बंद करण्याच्या बहाण्याने सराफी पेढीतून बाहेर पडला आणि काही समजण्याच्या आत पसार झाला.