पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महाेत्सवात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी कोकणातील १२ शेतकऱ्यांचे मोबाईल संच लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अक्षय अभय थोटम (रा. हुर्शी, ता, देवगड, जि. सिंधुदुर्ग ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केटयार्डमध्ये पणन मंडळाकडून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबा महोत्सवात कोकणातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकरी स्टाॅलजवळ रात्री झाेपले होते. त्यावेळी चोरट्यांनी बारा शेतकऱ्यांचे मोबाईल लांबविले. मोबाईल चोरीला गेल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
हेही वाचा – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीची दिल्लीला भुरळ
पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. अंधार असल्याने तपासात अडथळे येत आहे. पोलिसांकडून मार्केट यार्ड परिसरातील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.