लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाविद्यालयीन तरुणांना धमकावून त्यांच्याकडील तीन मोबाइल संच चोरट्यांनी चोरून नेण्यात आल्याची घटना कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण आणि त्याचे दोन मित्र गुरुवारी (१५ ऑगस्ट) पहाटे चारच्या सुमारास कर्वे रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी गरवार मेट्रो स्थानकाजवळ दुचाकीवरून आलेल्या चौघांनी तरुण आणि त्याच्या मित्रांना अडवले. त्यापैकी एका चोरट्याने मोबाइल संच संपर्क साधण्यासाठी मागितला. तरुणासह त्याच्या मित्राला शिवीगाळ करुन चोरट्यांनी धमकावले. तरुणासह त्याच्या मित्रांकडील तीन मोबाइल संच चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव तपास करत आहेत.