पुणे : बंद सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा नऊ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या. कोरेगाव पार्क भागातील नेलर रस्त्यावर असलेल्या अतुर पार्क सोसायटीतील सदनिकेतून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत अमित सतपाल कोचर (वय ५८) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरणारा गजाआड; साडेतीन लाखांचा ऐवज जप्त
१२ डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरटा अतुर पार्क सोसायटीत शिरला. कोचर कुटुंबीय झोपेत होते. चोरट्याने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून कोचर यांच्या सदनिकेत प्रवेश केला. कपाट उचकटून चोरट्याने दागिने आणि रोकड असा ऐवज चोरून नेला. याच सोसायटीतील रायचंद्र ग्रुप ऑफ कंपनीच्या कार्यालय आणि आणखी एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करत आहेत.
हेही वाचा >>> पुणे : पादचारी दिनासाठी शहरातील इतक्या चौकांमध्ये फक्त रंगरंगोटीच !
वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. वडगाव शेरीतील गणेशनगर भागातील एका सदनिकेतून चोरट्याने मोबाइल संच आणि अंगठी असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर भागातील पापडे वस्ती परिसरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत रितेश भीमरावजी पिसे (वय ३७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.