नगर रस्त्यावरील एका उपाहारगृहाच्या समोर छायाचित्रकाराला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच, तसेच स्मार्ट वाॅच असा मुद्देमाल लुटून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून मोबाइल संच आणि स्मार्ट वाॅच जप्त करण्यात आले.
हेही वाचा- पुणे: महिला वसतिगृहात प्रवेश न दिल्याने डिलिव्हरी बॉयची सटकली, व्यवस्थापकाला दांडक्याने मारहाण
अमित प्रकाश इंगोले (वय १९) आणि सागर सुनील सांगडे (वय २१, दोघे रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका २६ वर्षीय छायाचित्रकार तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. छायाचित्रकार तरुण नगर रस्त्यावरील एका उपहारगृहात जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी इंगोले आणि सांगडे यांनी छायाचित्रकार तरुणाला अडवून धमकावले. त्याच्याकडील मोबाइल आणि स्मार्ट वॉच काढून चोरटे तेथून पसार झाले. छायाचित्रकार तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
हेही वाचा- डाळिंबाचा बोगस विमा काढणारी टोळी सक्रिय
पसार झालेले चोरटे मंत्री आयटी पार्क परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी तरुणाला लुटल्याची कबुली दिली. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संगीता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, योगेश थोपटे, गिरीष नाणेकर, सचिन जाधव, सचिन कदम, दादा बर्डे आदींनी ही कारवाई केली.