लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मेट्रोच्या गोदामातून सहा लाख २८ हजारांचे साहित्य चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. खडकी परिसरातही घटना घडली.
वरुण भुपेंद्र नायडू (वय २२), सैबन्ना बसवराज पुजारी (वय २३, दोघे रा. आदर्शनगर, बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक जिओजॉन्सन एझेर (वय ३२, रा. सीतामणी हाउसिंग सोसायटी, आदर्शनगर, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी मेट्रो स्थानक परिसरात मेट्रोचे गोदाम आहे. गोदामात मेट्रोने वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवले होते. आरोपींनी मेट्रोच्या गोदामाचे कुलूप तोडून सहा लाख २८ हजार रुपयांचे साहित्य चोरले. दोघे जण पुन्हा साहित्य चोरण्यासाठी गोदामाच्या परिसरात आले. तेव्हा सुरक्षारक्षकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगले तपास करत आहेत.
यापूर्वी मेट्रोचे साहित्य चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाजीनगर, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचा लोखंडी खांब चोरून पसार झालेल्या चोरट्यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. गणेशखिंड रस्ता परिसरात मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली होती.