लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मद्यविक्री दुकानातील रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली.
याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५७, रा. शिवणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे यांचे नऱ्हे परिसरात मद्यविक्री दुकान आहे. रविवारी (२३ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास इंगळे दुकान बंद करून घरी निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी इंगळे यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. इंगळे यांनी चोरट्यांना विरोध केला. इंगळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवाशी जमा झाले.
हेही वाचा… पुणे : व्यावसायिकांना करोडो रुपयांना फसविणारी महिला अटकेत
दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. चोरटे भरधाव वेगाने दुचाकीवरून पसार झाले. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.