‘रस्ते, सिंचन व्यवस्था या क्षेत्रांत विकास साधताना पर्यावरणाचा विचार करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांचा सहभाग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पर्यावरण संवर्धनाचे कार्य साध्य होणार नाही,’ असे मत पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी व्यक्त केले.
पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आळंदी ते पंढरपूर पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर वैशाली बनकर, एमपीसीबीचे अधिकारी व्ही. एम. मोटघरे, शाहीर देवानंद माळी, प्रकाश खांडगे, चंदाबाई तिवाडी, पर्यावरण दिंडीचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज वाभळे आदी या वेळी उपस्थित होते. पर्यावरणाची दिंडी बुधवारी प्रस्थान ठेवणार असून त्यात लोककलांच्या आधारे पर्यावरणरक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे.
देवतळे म्हणाले, ‘‘अनवधानाने किंवा विकासास्तव आपण प्रदूषणास कारणीभूत ठरतो. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या दुर्दैवी घटनेला मानवच जबाबदार आहे का, याचा विचार करायला हवा. काही शहरांत सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा अपुऱ्या आहेत. येथे सांडपाणी नदीत सोडले जाते. मुंबईत प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे काही ठिकाणी पाणी वाहून जाण्याचे मार्गही बंद झाले. ग्रामीण भागांत जेवणासाठी प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर वाढला आहे. जे वापरायला सहज सोपे दिसेल त्याकडे आपण वळतो, पण त्याच्या पर्यावरणीय दुष्परिणामांचा विचार करत नाही.’’             पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचे मंगळवारी पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत ज्ञानेश्वर महाराज वाभळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रस्थान ठेवणारी ८६ क्रमांकाची दिंडी लोककलांमधून पर्यावरणरक्षणाचा संदेश देणार आहे.

Story img Loader